निवडणुकीत राडा घातल्याप्रकरणी शिवसेना खासदाराच्या पत्नीला १ वर्षाची शिक्षा

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई सत्र न्यायालयाने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळ यांच्या पत्नीला एक वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्यावर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राडा घातल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कामिनी शेवाळे यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने एक वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कामिनी शेवाळे यांनी शिवसेना-मनसे मध्ये झालेल्या राड्यात एका पोलीस हवालदाराला बेदम मारहाण केली होती. न्यायालयाने शेवाळे यांच्या पत्नीसह १७ जणांना ही शिक्षा सुनावली आहे. कामिनी शेवाळे यांनी न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजुर केला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मनसे आणि शिवसेना कार्य़कर्त्यांमध्ये तुर्भे येथे पैसे वाटण्यावरून राडा झाला होता. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले होते. त्यावेळी या ठिकाणी कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी विकास थोरबोले यांनी दोन्ही पक्षांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, संतप्त कामिनी शेवाळे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस हवालदाराला बेदम मारहाण केली होती.

काय आहे प्रकरण

मानखुर्द-महाराष्ट्रनगर येथे मध्यरात्री मतदारांना पैसे वाटण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना व मनसेचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्हीकडून दगडफेक करण्यात आली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस हवालदार विकास थोरबोले यांनाही लक्ष्य करण्यात आले. त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये थोरबोले यांची अन्ननलिका व श्वसननलिका कापल्या. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांची पत्नी व माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे, कर्मचाऱ्याला मारहाण करणे, दंगल माजवणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.