राज ठाकरे यांच्या ED चौकशीवर संजय राऊत म्हणतात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीला सामोरे जात आहेत. खबरदारी म्हणून ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि २०० हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून विरोधकांवर दबाब वाढवत आहे असा आरोप होत आहे. या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे

संजय राऊत म्हणले की , ‘सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करत आहे असे आरोप होत राहतात. विरोधी पक्षामध्ये असताना आम्हीही असचं म्हणत होतो. तपास यंत्रणांना स्वतंत्रपणे काम करू दिलं पाहिजे. पी. चिदंबरम यांचं प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे. त्यांच्या मुलाला आधी अटक झालेली आहे. त्या प्रकरणातील साक्षी पुरावे वेगळं सांगतात. अर्थमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांच्या कुटुंबियांना फायदा झालेला आहे. चिदंबरम गृहमंत्री, अर्थमंत्री होते. ते एक निष्णात वकील आहेत. कायदा त्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे. जेव्हा त्यांचा जमीन अर्ज फेटाळला तेव्हा ते ताबडतोब सीबीआय मुख्यालयात हजर राहिले असते तर त्यांची प्रतिष्ठा राहिली असती. देशाचे माजी गृहमंत्री फरार होतात हे त्यांच्याभोवती संशय वाढवणार आहे. दरवेळेस तपास यंत्रणा दबावाखाली काम करतात हे म्हणणं त्यांचे खच्चीकरण करणारे आहे.’

राज ठाकरे यांची पाठराखण करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौकशीतून काही निघेल असे वाटत नाही असे वक्तव्य केले होते. त्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की , ‘उद्धव ठाकरे काल म्हणाले होते तपास सुरु आहे राज त्यातून बाहेर पडतील. उद्धव ठाकरेंचं विधान बंधू प्रेमातूनच करण्यात आलं होतं, त्यात कोणताही राजकीय अर्थ नाही. शेवटी राजकारणात निर्णय घेतला म्हणजे कोणी त्रास देत नाही. देशात लोकशाही अजूनही आहे. राज ठाकरे चौकशीला सामोरे जात आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांनी चिदंबरम यांच्याप्रमाणे टाळाटाळ केली नाही ते स्वतः कुटुंबासह तेथे उपस्थित झाले आहेत. त्यातून वेगळं वातावरण निर्माण करणं, तणाव निर्माण करणं पूर्णपणे चुकीचं आहे. ‘

कोहिनूर गैरव्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांना सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज हे आता ईडीच्या कार्यालयात पोहोचले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –