‘मातोश्री’च्या अंगणातच शिवसेनेत ‘उद्रेक’ ! नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंतांचा पत्ता कट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान ज्या मतदारसंघात येते, त्या वांद्रे पूर्व मधील शिवसैनिकांचा उद्रेक झाला आहे. गुरुवारी रात्रीपासून सुमारे ४०० ते ५०० शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर ठाण मांडला आहे. कारण, तत्कालीन काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा पराभव करुन निवडून आलेल्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कट करुन शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सावंत समर्थक संतप्त झाले आहेत.

वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा गड राहिला आहे. त्यात या मतदारसंघात शिवसेना प्रमुखांचे निवासस्थान येत असल्याने शिवसेनेच्या दृष्टीने या मतदारसंघाला वेगळे महत्व आहे. २०१४ मध्ये बाळा सावंत हे निवडून आले होते. मात्र, २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व विरोधकांनी नारायण राणे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेने तृप्ती सावंत यांना उभे केले होते. सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव करुन त्यांना मोठा धक्का दिला होता.

मात्र, आता याच तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. ते मातोश्रीच्या बाहेर ठाण मांडून बसले असून उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना तिकीट का नाकारले याचे कारण सांगावे, असा त्यांचा प्रश्न आहे. आपल्याला उत्तर मिळाल्याशिवाय येथून उठणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचे समर्थक मानले जाणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वांद्रे पूर्वमधून उमेदवारी दिली आहे. ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे तृप्ती सावंत काय निर्णय घेतात यावर या मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यांनी बंडखोरी केली तर शिवसेनेला थेट घरातच बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

visit : Policenama.com