‘अजान’ स्पर्धेवरुन प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर ‘हल्लाबोल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी याकरीता शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे. त्यावरुन भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचे सत्तेनंतरच बदलत स्वरूप स्पष्ट करणारे आहे. कहर म्हणजे त्यांनी बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलण्याच कधी बोलले नाही तर त्यांनी त्यांच्या आचार विचारावर टीकाच केली असे प्रविण दरेकर म्हणाले.

सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. मातोश्रीत नमाज पठण केल्याचे मोठ विधान त्यांनी केले आहे. सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत आणि म्हणून राऊत यांच्याकडून सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला नेतृत्वाला तिलांजली देणारी वाटचाल येथे सुरु असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नमाजासंदर्भात भोंग्यावरुन त्यांनी घेतलेली भूमिका व त्यांनी केलेली कडवट टीका देशवासियांनी पाहिलेली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा व देशप्रेमाचा विसर सातत्याने शिवसेनेला पडत चालल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.