‘हायप्रोफाईल’ आरोपीला बिर्याणी खाण्यास, दाढी करण्यास दिली परवानगी ; २ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – खंडाळा येथील ५० कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडवाला याला कागदोपत्री तपासासाठी घरी नेल्यानंतर त्याला बिर्याणी खाऊ देणे २ पोलीस अधिकाऱ्यांना महागात पडले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

विलास राठोड आणि संदीप सावंत  अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.

बनावट कागदपत्रांच्या आधारे खंडाळा येथील चार एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडवाला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला गुजरातमधून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या गुन्ह्यात कागदोपत्री तपास करण्यासाठी त्याला दोन दिवसांपुर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कार्टर रोड येथील त्याच्या घरी नेले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या घराची झाडाझडती सुरु केली. तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याला बिर्याणी खाण्यास देण्याची विनंती केली. त्याला अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यानंतर तो घरी शौचालयात गेला. तसेच वाढलेली दाढीही काढली.

दरम्यान पुन्हा त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दाढी अधिकाऱ्यांना दिसली नाही. त्यावेळी चौकशी केल्यावर लकडवालाला बिर्याणी खाऊ देणे व दाढी करू देणे यासाठी परवानगी दिल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर दोघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Loading...
You might also like