26/11 दहशतवादी हल्ला : ‘त्या’चवेळी रतन टाटांना करायचा होता ‘ताज’मध्ये प्रवेश, पण…

पोलीसनामा ऑनलाइन – 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेलसहीत सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यांमध्ये 160 जणांचा मृत्यू झाला होता. एकट्या ताजमध्ये दहशतवाद्यांनी 31 जणांचे प्राण घेतले. जवळजवळ 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरू होती. हल्ल्यात ताज हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते. ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यानंतर टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा स्वत: तिथे पोहाेचले होते. मात्र, हॉटेलमध्ये गोळीबार होत असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. या घटनेसंदर्भातील खुलासा स्वत: रतन टाटा (mumbai-terror-attacks-26-11-ratan-tata-talks-about-taj-hotel ) यांनी केला आहे. नॅशनल जिओग्राफीच्या मेगा आयकॉन्सच्या दुसऱ्या पर्वामध्ये दिलेल्या मुलाखतीत टाटांनी अनेक गोष्टींबद्दल पहिल्यांदाच खुसाला केला असून, त्यामध्ये मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा ताजमध्ये गेल्यानंतरचा अनुभवही सांगितला आहे.

2008 च्या हल्ल्याबद्दल बोलताना रतन टाटा म्हणाले की, कोणीतरी मला 26 नोव्हेंबर 2008 रोजी फोन करून ताजमध्ये गोळीबार होत असल्याची माहिती दिली. मी ताजच्या एक्सचेंजमध्ये फोन केला. पण तो कोणी उचलला नाही. हे अगदीच विचित्र होते. मग मी स्वत: गाडी घेऊन तिथे गेलो. मात्र, सुरक्षारक्षकाने मला हॉटेलच्या लॉबीमध्ये जाऊ दिले नाही. कारण तिथे गोळीबार होत होता असे टाटा म्हणाले. त्यानंतर खुद्द टाटांनी टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आर. के. कृष्णकुमार यांना फोन करून यासंदर्भातील माहिती दिली. ताजमध्ये काहीतरी गडबड झाली आहे. तिथे गोळीबार होत आहे असे मला रतन टाटांनी फोन करून सांगितले, असे त्या दिवशाची आठवण सांगताना कृष्णकुमार म्हणाले.

…अन् टाटांनीदेखील काढले तीन दिवस तीन रात्री पदपथावरच
हल्ला झाला त्यावेळी हॉटेलमध्ये 300 पाहुणे होते. अनेक ठिकाणांवरून हॉटेलमधील ग्राहकांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले. यात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खूपच कष्ट घ्यावे लागले. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची काही योजना नसतानाही त्यांनी अनेकांना सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र, हे सारे करताना त्यापैकी काही जणांना आपला प्राण गमावावे लागल्याचे टाटा यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. या संकट प्रसंगामध्ये रतन टाटा हे ताजच्या व्यवस्थापनाबरोबर आणि तेथील कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे उभे होते. हल्ला झाल्यापासून पुढील तीन दिवस तीन रात्री त्यांनी हॉटेलच्या बाहेरील पदपथावरच काढल्याचे कृष्णकुमार यांनी म्हटले आहे.

भिंतीवर गोळ्यांचे निशाण, तुटलेल्या काचा, जळालेले वॉलपेपर
दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर रतन टाटा जेव्हा पहिल्यांदा ताजमध्ये गेले तेव्हा त्यांनी काय पाहिले यासंदर्भातील त्यांनी मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे. जे घडले त्यानंतर मी आणि कृष्णकुमार यांना मुख्य प्रवेशद्वारामधून वसाबी रेस्तराँमध्ये घेऊन सोडण्यात आले. त्याच ठिकाणी शेवटचा गोळीबार झाला होता. तिथे भिंतीवर गोळ्यांचे निशाण, तुटलेल्या काचा, जळालेले वॉलपेपर अशी स्थिती होती. आम्ही तिथे गेलो तेव्हा लाईट्सही नव्हते. ती परिस्थिती पाहून पुढील क्षणी कुठूनतरी गोळीबार होईल, अशी भीती वाटत होती. गोळीबार खरेच थांबला आहे का अशी शंकाही मनात येत होती, असे त्या दिवसाची आठवण सांगताना रतन टाटा म्हणाले.

टाटा स्वत: रुग्णालयात जाऊन जखमींना भेटले अन्…
ताजवरील दहशतवादी हल्ल्यानंतर रतन टाटा आणि कृष्णकुमार हे दोघे अनेक रुग्णालयांमध्ये जाऊन ताज येथील हल्ल्यात जखमी झालेल्या प्रत्येक रुग्णाला स्वत: भेटले. ताजमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांबरोबरच इतर ठिकाणी या हल्ल्यात बळी पडलेल्यांसाठी काहीतरी करावे असा विचार केला. या लोकांना मदत करण्यासाठी पब्लिक वेलफेअर ट्रस्ट सुरू करावा, असे आम्हाला वाटले आणि आम्ही त्याची सुरुवात ताजपासून केली असे कृष्णकुमार म्हणाले.

शिक्षणाची जबाबदारी अन् पगार दिला
ताजमधील कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धीतीने या संकटाचा सामना केला, त्याचा अपल्याला अभिमान असल्याचे टाटा सांगतात. “अनेक गोष्टींबद्दल मला ताज आणि तेथील कर्मचाऱ्यांचा अभिमान वाटतो. त्यांनी जे केले ते अभिमानास्पद आहे. आम्ही सर्वांनी एक एक वीट एकत्र करून ताज पुन्हा उभे केले. पण मरण पावलेल्यांच्या मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतली. मरण पावलेल्या व्यक्तींच्या निवृत्तीच्या वयापर्यंतचा पगार त्यांच्या कुटुबीयांना आम्ही दिला आहे. हे सगळं आम्हाला करता आले, त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे रतन टाटा या मुलाखतीमध्ये म्हणाले.