हवामानात बदल; कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रातील वायव्य भाग ते पंजाबचा उत्तर भाग दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे उत्तर भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान असल्याने थंडीचा कडाका काही प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांत रविवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून मुंबईतही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे.

मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर विदर्भाच्या बऱ्याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.६) आणि गुरुवारी (दि.७) कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आज सोमवारी (दि.४) आणि मंगळवारी (दि.५) मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी (दि.६) आणि गुरुवारी (दि.७) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे.