‘पंचगंगेला सहा महिन्यांत प्रदूषणमुक्‍त करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोणत्याही परिस्थितीत पुढील सहा महिन्यांत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्‍त झाली पाहिजे, असे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिला आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी पंचगंगा नदीत सोडावे अशी सूचना कदम यांनी केली. शिवाय जे कारखाने प्रदूषित, रासायनिक पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता नदीच्या पात्रात सोडतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेश त्यांनी दिले आहे.

नुकतीच पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत आढावा बैठक पार पडली. पर्यावरणमंत्री कदम, शिरोळचे आमदार उल्हास पाटील, कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, पर्यावरण विभागाचे अधिकारी यावेळी या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी पंचगंगा नदी स्वच्छ करण्याबाबत काही सूचना केल्या.

दापोली, मंडणगडमधील जेटी, रस्त्यांची कामे तातडीने करा

या बैठकीत बाणकोट आणि हर्णे बंदराची कामे तसेच किनारपट्टी भागातील रस्त्यांच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्य म्हणजे दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील विविध जेटींची आणि रस्त्यांची कामे तसेच धूप प्रतिबंधक बंधार्‍यांची कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश रामदास कदम यांनी दिले. तर 15 जेटींची कामे लवकरच सुरू होत असून जिल्हा वार्षिक योजनेची 31 कामे प्रगतिपथावर आहेत अशी माहिती बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

बारा नाल्यांच्या पाण्याने पंचगंगा प्रदूषित

यावेळी बोलताना,  एकूण 12 नाल्यांचे पाणी नदीत सोडल्याने प्रदूषण वाढले असल्याचे पर्यावरणमंत्री  रामदास कदम यांनी सांगितले. शिवाय कोल्हापूर पालिका आणि इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील सांडपाणी, कारखान्यांतील प्रदूषित पाणी नदीच्या पात्रात येण्यापासून रोखले गेले पाहिजे असे त्यांनी सूचवले. शहरातील सांडपाणी, कारखान्यांतील प्रदूषित पाणी नदीच्या पात्रात येण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची सूचनाही यावेळी त्यांनी दिली. इतकेच नाही तर,  जे कारखाने प्रदूषित, रासायनिक पाणी पंचगंगेत सोडतात त्यांची नावे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवा असेही त्यांनी कदम यांनी म्हटले.