…म्हणून सुप्रिया सुळे यांचे बारामतीत काही खरे नाही : तावडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या मंगळवारी होणार आहे. राज्यात बारामती लोकसभा मतदार संघाची चर्चा आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर भाजपकडून कांचन कुल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबई येथे बोलताना ‘सुप्रिया सुळे यांचे बारामतीत काही खरे नाही’ असे म्हणत टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना तावडे म्हणाले, ‘शरद पवार सध्या बुथवरच्या सामान्य कार्यकर्त्याला देखील फोन करून माझ्यासाठी हे कर, माझ्यासाठी ते कर अशा प्रकराची भाषा वापरत आहेत. याचाच अर्थ सुप्रिया सुळे यांचे बारामतीत काही खरे नाही,  हे बहुदा त्यांना कळाले असावे. ‘असा टोला विनोद तावडे यांनी लगावला. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

त्यांच्या पायाखालील वाळू सरकलेली दिसत आहे

पुढे बोलताना तावडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणुकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते. यावेळी पुढे बोलताना तावडे म्हणाले, पवारांच्या मुलीचे काय होईल ?

अजितदादांच्या मुलाचे काय होईल ? मुलायमसिंह यांच्या मुलाचे काय होईल ? याचा विचार करू नका, तर आपल्या मुलाबाळांचे काय होईल याचा विचार करा. राजकीय नेत्यांनी आपापल्या मुलाबाळांसाठी भरपूर संपत्ती गोळा करून ठेवली आहे. त्यामुळे आपापल्या मुलांचे भले करायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्वच निवडून दिले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.