मद्यधुंद टीव्ही अभिनेत्रीचा धिंगाणा ! ७ गाड्यांना धडक तर पोलिसांना मारहाण

मुंबई : वृत्तसंस्था – टीव्ही अभिनेत्री रुही सिंह आणि तिच्यासोबत आलेल्या मित्रांनी मुंबईत काल रात्री बांद्रयातील एका रेस्टॉरेंटबाहेर धिंगाणा घातला. एव्हढेच नाही तर रेस्टॉरेंटबाहेर उभ्या असलेल्या ७ गाडयांना धडक दिली तसेच पोलीस कॉन्स्टेबलचा मोबाईल हिसकावला आणि कानशिलात लगावली. याप्रकरणी रुहीवर गुन्हा दाखल करून तिला अटक ठरण्यात आली आहे. तिच्या विरोधात पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणे आणि मद्यपान करून गाडी चालवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबरोबरच तिचे मित्र राहुल सिंह, स्वप्नील सिंह यांना देखील अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री रूही आणि तीचे चार मित्र रात्री उशीरा एका पबमधून येत होते. यावेळी रस्‍त्‍यात बांद्रा इथल्‍या एका रेस्टॉरेंटधमध्ये पोहचले. रेस्टॉरेंटच्या कर्मचाऱ्यांनी रेस्टॉरेंट बंद झाल्याचे रूहीला सांगितले. पण रूही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने लगेच रेस्टॉरेंट उघडण्याचे फर्मान सोडले. तिला रेस्टॉरेंटचे वॉशरूम वापरायचे होते. कर्मचाऱ्यांनी यास नकार दिला आणि रूही व तिचे मित्र संतापले. त्यामुळे रेस्टॉरेंटचे कर्मचारी आणि रुहीचे मित्र यांच्यात जोरदार वादावादी झाली. यानंतर इथल्‍या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली.

या माहितीवरून पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. इथल्‍या अधिकार्‍याच्या माहितीनुसार यावेळी रूही आणि तीच्या दोन मित्रांनी दोन पोलिसांनाच मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले असता रूहीने पोलिसांनाही धक्काबुक्की केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला जात असताना रूहीने संबंधित कॉन्स्टेबलचा मोबाईल हिसकावला आणि त्याच्या मुस्काटात लगावली. ती इथेच थांबली नाही तर, गाडीने तिने रेस्टारेंटच्या बाहेर उभ्या असलेल्या ७ गाड्यांनाही धडक दिली. यावेळी रूही स्वत: गाडी चालवत होती. या प्रकरणात पोलिसांनी रुही आणि तिच्या मित्रांना अटक केली आहे.