मुंबईच्या वरळीत BMW चालक महिलेचं नियंत्रण सुटलं, अपघातात पुण्यातील 6 महिन्याच्या चिमुरडीसह तिघांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगातील बीएमडब्ल्यू मोटार चालक महिलेचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात पुण्यातील 6 महिन्यांच्या चिमुरडीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वरळीतील खान अब्दुल गफार खान मार्गावर हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मूळची पुण्याची असून काल आईला भेटण्यासाठी मुंंबईत गेली होती. त्यानंतर त्या वरळीतील खान अब्दुल गफार खान मार्गावरुन मोटारीतून जात होती. त्यावेळी मोटारीत महिलेसह चार जण प्रवास करीत होते. महिलेचे मोटारीवरील नियंत्रण सुटून मोटार दुभाजकाला जाऊन आदळली. त्यामुळे एका चिमुरडीसह तिघेजण ठार झाले. जखमींना त्वरित जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक महिलेला रूग्णलायातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.