सरकारने OBC आरक्षणाचे ३ तुकडे करणं हे समाजासाठी घातक : छगन भुजबळ

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – केंद्राकडून ओबीसी आरक्षणाबाबत न्या. रोहिणी आयोग नेमून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींचे तीन तुकडे करणं हे अतिशय घातक असल्याचा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केला आहे. मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची आढावा बैठक मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. ओबीसी आरक्षणाचा ओबीसींतील काही घटकांनाच लाभ होतो असे कारण देत सरकारने न्या. रोहिणी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. हा आयोग नेमून ओबीसींचे तीन भाग करण्याचे काम सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणात २ हजार ६२३ जाती आहेत. त्यातील ९८३ जातींना लाभ मिळत नसल्याचा निष्कर्ष काढला. त्यामुळे ज्यांना लाभ मिळत नाही त्यांना १० टक्के, अंशतः लाभ मिळणाऱ्यांना १० टक्के व सर्वाधिक लाभ मिळणाऱ्यांना ७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जात असून ओबीसीतील केवळ १० जातींना २५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे निष्कर्ष काढला जात आहे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, समाजातील वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी समता परिषदेची स्थापना करण्यात आली होती. समता परिषद गेल्या २७ वर्षापासून काम करत आहे. त्याच्या माध्यमातून आरक्षण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासह अनेक कामे झाली. सर्व समाजामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या समतेची ज्योत तेवत ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.