बहिणीच्या न जन्मलेल्या बाळाची हत्या करणाऱ्या तरुणाला साडेतीन वर्षांची शिक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गर्भवती बहिणीच्या पोटात लाथा मारल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सेशन्स कोर्टाने हत्येच्या प्रकरणात ऐतिहासिक नकार दिली आहे. कोर्टाने आरोपीला साडेतीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मनोज कराखे असे या तरुणाचे नाव आहे. त्याला भादंवि कलम 316 अन्वये त्याला दोषी ठरवण्यात आलं असून त्याला साडेतीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

आरोपीला कलम 316 अन्वये 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याच्यावर इतरही कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले होते. या आरोपीविरोधात पीडित तरुणी, आई, बहीण आणि बहिणीच्या नवऱ्याने साक्ष दिली होती. असे सरकारी वकील प्रांजली जोशी यांनी सांगितले. मनोजची बहीण पतीसोबत रहात होती तर तो तिच्या शेजारील घरामध्ये राहत होता. ही घटना 2017 मध्ये घडली होती.

2017 मध्ये आरोपी मनोजची बहिण चार महिन्यांची गरोदर होती. 16 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी दहाच्या सुमारास मनोज आणि दुसऱ्या बहिणीसोबत मोठं भांडण झालं. पीडित महिला दोघांमधील भांडण सोडवण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करून पोटात लाथा मारल्या. यामुळे महिला बेशुद्ध झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महिलेची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटातील बाळ दगावल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर मनोजवर एफआयआर दाखल करण्यात आली आणि त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मंगळवारी आरोपीला शिक्षा सुनावली.