मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील पहिल्या सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या परीक्षा 31 डिसेंबर पर्यंत होणार आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 जानेवारीपर्यंत होणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियोजन निर्देशानुसार परीक्षांच्या तारखा व नियोजन करण्याबाबत कणकवली महाविद्यालयात जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य व परीक्षा विभाग प्रमुखांची सहविचार सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे होत्या. तसेच कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले, देवगड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांभळे, प्राचार्य डॉ. सतीश कामत, फणसगाव कॉलेजचे डॉ. आशिष नाईक आदी उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाच्या नियोजनानुसार प्रथम वर्ष कला, वाणिज्य, विज्ञान सेमिस्टर 1 च्या परीक्षा 9 जानेवारी 2021 पर्यंत घ्याव्यात, असे ठरविण्यात आले. यात कला, वाणिज्य विज्ञान या पारंपारिक अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदवीव्युत्तर परीक्षा 60 गुणांच्या ऑनलाईन पध्दतीने होतील. यात 50 बहुपर्यायी प्रश्न असतील. तसेच या परीक्षेसाठी 1 तासाचा अवधी विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ कदम यांनी केले. प्रा. वियन दुबळे यांनी आभार मानले.