मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस

मुंबई:पोलीसनामा ऑनलाईन

परीक्षांचे निकाल राखडल्यामुळे मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार निदर्शनास आला होता. याबाबतीत राज्यपालांनी मुंबई विद्यापीठाला सुनावले होते असे असून देखील विद्यापीठाच्या कारभारात किंचित देखील फरक पडलेला नाही. आता पुन्हा एकदा विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकात घोळ घालून पुन्हा एकदा कार्यपद्धतीवर टीका होईल असे काम केले आहे.

याबाबतीत मिळालेली अधिक माहिती अशी की, विद्यापीठाने पदवीत्तोर परीक्षांच्या वेळापत्रकात घोळ घातल्यामुळे एका विद्यार्थिनीला परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास सोडून वेळापत्रकात बदल करून घेण्यासाठी धावाधाव करावी लागली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी समाजशास्त्रात एम.ए. करत आहे.

दोन विषयांची परीक्षा एकाच दिवशी

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तिने मानसशास्त्र विभागातील ‘चेंज मॅनेजमेंट’ हा विषयही अभ्यासासाठी निवडला आहे. मात्र, विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार क्वांटिटेटिव्ह रिसर्च आणि चेंज मॅनेजमेंट या दोन्ही विषयांची परीक्षा आज (बुधवारी) सकाळी 11 वाजता आहे. या दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या केंद्रांवर आहेत. त्यामुळे या विद्यार्थिनीसमोर मोठा पेच उभा राहिला होता. तिने ही गोष्ट विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही दिली. मात्र, विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांकडून तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अगदी कालपर्यंत ही विद्यार्थिनी अभ्यास सोडून विद्यापीठात खेटे घालत होती. तिने तब्बल पाच तास घालवून परीक्षेची वेळ बदलण्याची मागणी केली. मात्र, तिला कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. याबाबत विद्यापीठ प्रशासनाला विचारण्यात आले असता आम्ही 15 दिवसांपूर्वीच वेळापत्रक जाहीर केल्याचे सांगितले. मात्र, आम्ही या समस्येवर नक्कीच तोडगा काढू. संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी हमी विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.