खासगी वाहनांसाठी कलर कोडचा निर्णय अखेर मागे, मुंबई पोलिसांची माहिती

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलिसांनी शहर आणि परिसरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांवर लाल, पिवळे आणि हिरवे स्टिकर बसविण्याचे दिलेले आदेश अखेर मागे घेतले आहेत. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विट करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी या नियमाची अंमलबजावणी केली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वत: या मोहिमेत सहभाग घेत काही गाड्यांना स्टीकर लावले होते. मात्र, हा निर्णय आता मागे घेतला आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारने मुंबईसह राज्यभरात कडक लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना फिरण्यास मुभा दिली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक गाड्या रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व गाड्यांवर लाल, पिवळे आणि हिरवे स्टिकर बसविण्याचे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रिय मुंबईकरांनो, लाल, पिवळा, हिरवा रंग # EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे.

मात्र संपूर्ण तपासणी चालू राहणार आहे. आम्ही आशा करतो की, आपण #Taking OnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळाल, असे म्हटले आहे. वैद्यकीय सेवेसाठी लाल, भाज्यांच्या गाड्यांसाठी हिरवा आणि इतर आवश्यक सेवांसाठी पिवळ्या रंगाचे स्टिकर वाहनांना लावले जात होते. असे स्टिकर न लावल्यास वाहनावर कारवाईचे आदेश दिले होते. जेणेकरून विनाकारण कारसह प्रवास करणाऱ्या लोकांवर कारवाई करता येईल आणि अत्यावश्यक सेवेतील कोणाची अडवणूक होणार नाही. मात्र, हा निर्णय मागे घेतला आहे