महावितरण भरती प्रक्रिया : ‘नितीन राऊतांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महावितरणच्या भरती प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली असल्याचे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केलं. शिवाय ऊर्जामंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास आंदोलन करण्याचा इशारा मेटे यांनी दिला आहे.

महावितरणातील उपकेंद्र सहाय्यक, पदवीधारक शिकाऊ अभियंता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयीन निर्देशाच्या अधीन राहून सर्व प्रवर्गातील उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC) वगळून नियुक्ती आदेश देण्यात येतील आणि अशा उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल, अशी जाहिरात महावितरणकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, या भरती प्रक्रियेबाबत मराठा समाज नाराज नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. मराठा समाजाच्या काही मुलांना ओपनमधून तर काहींना SEBC मध्ये सामावण्यात आल असल्याचे त्यांनी म्हटलं. त्यामुळे मराठा समाज महावितरणच्या भरती प्रक्रियेसंदर्भात नाराज नसल्याचे राऊत म्हणाले. त्यावरती नितीन राऊत यांनी दिलेल्या शब्द पाळला नाही तर आंदोलनाचे हत्यार उपसू, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला. तद्वत, भरती प्रक्रियेतील उमेदवारांना सावध पवित्र घेण्याचे आवाहनही मेटे यांनी केलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

महावितरणच्या भरती प्रक्रियेस, मराठा क्रांती मोर्च्याचा विरोध

“महाराष्ट्र सरकारने दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर मराठा समाजाला संक्रांत भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाने वारंवार सांगितले आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षण विषय संपत नाही तोपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाऊ नये. वरिल निर्णय जे विद्यार्थी पास झाले आहेत. फक्त नियुक्ती आदेश राहिले आहे त्यांचे आहेत. म्हणजे मराठा आरक्षण घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना हे सरकार बाजूला ठेवून इतरांना नियुक्ती देत आहे. शुभ मुहूर्त हा दिवाळी घेतला कारण सण असल्याने आंदोलन होणार नाही. बाकी सर्व मराठे सूज्ञ आहेत” अशा शब्दांत महावितरणच्या भरती प्रक्रियेस मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवला आहे.