…तसा प्रयत्न केल्यास आम्ही मोर्चा रोखणार : सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राज्यातील शेतकरीही रविवारी (दि. 24) हजारोंच्या संख्येने मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. राजभवनावर जाण्याची या शेतकरी आंदोलकांची तयारी आहे. दरम्यान यासंदर्भात बोलताना मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (vishwas nangare patil)  म्हणाले, न्यायालयाच्या आदेशानुसार दक्षिण मुंबईत मोर्चाला परवानगी देता येत नाही. यासंदर्भात आम्ही मोर्चाशी संबंधित शिष्टमंडळ आणि नेतेमंडळींची भेट घेतली आहे. त्यांना समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. मात्र, राजभवनावर जाण्याचा शेतकऱ्यांचा आग्रह आहे. त्यांनी राजभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केलाच तर आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे शिष्टमंडळ राजभवनापर्यंत घेऊन जाऊ, असे नांगरे पाटील (vishwas nangare patil) यांनी म्हटले आहे.

Advt.

केंद्र सरकारने आणलेल्या शेतीविषयक तीनही कायद्यांना विरोध करत गेल्या दोन महिन्यांपासून देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी थंडीची तमा न बाळगता, हे कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. विविध राज्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी मुुंबईत जमा झाले आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वमीवर दक्षिण मुंबईत 800 च्यावर पोलीस कर्मचारी, अधिकारी तैनात केले आहेत. याशिवाय कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत आंदोलक शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, अशी सूचना देत असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत आहेत. सांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सांगलीतून शेतक-यांचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने येणार आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह शेतकरी यामध्ये सहभागी होतील, असे राजू शेट्टी यानी सांगितले आहे.