अत्यावश्यक सेवा वगळता आज मुंबई बंद, BMC नं केलं आवाहन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – धुव्वाधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मुंबई बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबईत अनेक भागांमध्ये 3 फुटांपर्यंत रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दाणादाण उडाली आहे. रेल्वे स्थानकात रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यामुळे वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला आहे.

मुसळधार पावसामुळे बृहनमुंबई महापालिकेने आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक सेवा आणि कामे वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. खासगी कार्यालये आणि इतर कामकाज बंद ठेवण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. मुंबईत दादर-कुर्ला आणि कुर्ला ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे लोकलच्या 4 सेवा विस्कळीत झाल्या आहेत. झव्हेरी बाजार परिसरात इलेक्ट्रिक लाईट बंद पडल्या आहेत.