ED विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार ! शिवसैनिक मुंबईत दाखल होणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडी कारवाई करत आहे. दरम्यान, प्रताप सरनाईकांपाठोपाठ संजय राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे. शिवसेनेने आता या संदर्भात आक्रमक पावित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. ५ जानेवारीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, तसेच खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं समजतं.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस पाठवली आहे. तेव्हा राऊत यांनी ईडी आणि त्यानिमित्ताने केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार आरोप केले आहेत. ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. याआधी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. ईडीच्या नोटिसा म्हणजे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारचे षडयंत्र असल्याचा शिवसेनेने आरोप केला होता.

येत्या ५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं समजतं. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस तसेच खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. येत्या ५ जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहे. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर राहणार आहेत. शिवसेनेकडून एकप्रकारचे शक्तिप्रदर्शनच केले जाणार असल्याचं समजतं. केंद्र सरकार तपास यंत्रणांचा कशाप्रकारे गैरवापर करीत आहे हेच यातून शिवसेनेला यातून दाखवायचे आहे. दरम्यान, याआधी भाजपचे कार्यालय असल्याचा बॅनर लावून शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर भाजपवर टीका केली होती.