Cyclone Updates : मुंबईकरांनो, कारमध्ये ‘या’ वस्तू ठेवायला विसरू नका ; पालिकेने केली महत्त्वाची सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या कोरोना व्हायरसशी झुंज देत असलेल्या महाराष्ट्रासमोर आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने येत असून बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. यासोबतच या वादळाचा फटका राजधानी मुंबईलाही बसणार आहे. त्यामुळे 26 जुलै 2005 चा दुर्दैवी पूर्वानुभव लक्षात घेता महानगरपालिकेने मुंबईकरांसाठी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहे. त्यानुसार, संभाव्य चक्रीवादळात खबरदारी म्हणून कार – जीप इत्यादी वाहनाने प्रवास करताना गाडी पाण्यात अडकल्यास किंवा ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास काच फोडण्यासाठी एखादे साधन असणे, गरजेचे असते.

26 जुलै 2005 रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेले होते, ज्यामुळे यंत्रणा बंद पडली, त्यांनतर गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच गेल्या वर्षी 2019 ला देखील अशीच एक घटना घडली होती, ज्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. या सर्व गोष्टी लक्षात घेता, खबरदारी म्हणून चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन गाडीत ठेवावे अश्या सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आल्या आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज 3 जून 2020 रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन महापालिकेने यापूर्वीच केलं आहे. तसेच जरी अत्यावश्यक कारणामुळे घराबाहेर पडायचे असल्यास आणि चारचाकी वाहनाने प्रवास करायचा झाल्यास खबरदारीची म्हणून गाडीमध्ये काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी, पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्यास विसरू नये. त्याचप्रमाणे हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे उपलब्ध होईल, अश्याठिकाणी ठेवावे, असेही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सांगितले आहे.