मुंडे प्रकरणातून माघार घेण्यासाठी धमकी दिली जातेय, रेणू शर्माचे वकिल रमेश त्रिपाठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करुन खळबळ उडवून देणारी रेणू शर्मा यांच्या वकिलांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेतली. यावेळी रमेश त्रिपाठी यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणातून माघार घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त, गृहमंत्री यांच्याकडे अर्ज केला असून त्यांच्याकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रारदार महिलेवर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असून ते खोटे असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले. या प्रकरणाच्या सखोल चर्चेनंतर न्यायालय निर्णय देईल. जीवाला धोका असल्याचे पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मूळ प्रकरणाला फाटे फोडण्याचे काम सुरु आहे. मला काल रात्रीपासून अज्ञात व्यक्तीचे फोन येत आहेत. प्रकरण मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

त्रिपाठी यांनी सांगितले की, मला सारखे धमकीचे फोन येत आहेत. मी जीवंत राहिलो तर मी माझ्या अशीलाची केस लढवू शकेल. यासाठी मी तक्रार करण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे आज आम्ही एसीपी कार्यालयात जबाब देण्यासाठी जाऊ शकलो नाही. एसीपी यांना मेल करुन याबाबत सांगितले असून उद्या (शनिवार) सकाळी अकरा वाजता कार्यालयात जबाब नोंदणीसाठी आम्ही येत असल्याचे सांगितले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कृष्णा हेगडे आणि मनीष धुरी यांनी रेणू शर्मा यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यावर बोलताना त्रिपाठी म्हणाले की, उद्या सकाळी अकरा वाजता एसीपी कार्यालयात जबाब दिल्यानंतर माझे आशिल तुमच्याशी या संदर्भात बोलतील. आज त्या येणार होत्या पण काही कारणास्तव त्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकल्या नाहीत. हनिट्रॅप संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, माझी अशीलाच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रेणू शर्मा हनिट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार होती. मात्र, तिने तसे केलेले नाही. तक्रारदारांनी केलेले सगळे आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले