भाजपचे अजफर शम्सी यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा तपास युध्दपातळीवर

पटणा : वृत्तसंस्था – भाजपचे बिहार प्रदेश प्रवक्ते अजफर शम्सी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात शम्सी हे जखमी झाले असून, त्यांच्यावर सदर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बिहारच्या मुंगेर येथील इव्हनिंग महाविद्यालयाजवळ घडली.

अजफर शम्सी हे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात. ते आपल्या गाडीने महाविद्यालयात जात असताना त्याचवेळी काही हल्लेखोर तेथे आले आणि त्यांनी शम्सी यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर शम्सी जखमी झाले असून, त्यांच्या मांडीला गोळी लागली. पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अजफर शम्सी यांच्यावर कोणत्या कारणामुळे गोळीबार करण्यात आला याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही.

पोलिसांकडून तपास सुरु
भाजपचे नेते असलेल्या अजफर शम्सी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तसेच या गोळीबारामागचे कारण काय, हे आता तपासानंतरच पुढे येईल.

घटना अत्यंत दु:खद
अजफर शम्सी यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी ही घटना अत्यंत दु:खद असल्याचे सांगितले. याप्रकरणी मी पोलिस महासंचालकांशी चर्चा केली आहे. सध्या अजफर शम्सी सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.