महापालिकांच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, पुणे काँग्रेस उपाध्यक्ष वीरेंद्र किराड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे : नगरपालिका, महानगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका पारदर्शी होण्याकरिता इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे ( ईव्हीएम) न घेता मतपत्रिकेद्वारे( बॅलेट पेपर ) घ्याव्यात अशी मागणी पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष वीरेंद्र किराड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,राज्य निवडणूक आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे. लोकशाही व्यवस्थेत आणि महानगरे, , छोटी शहरे, तालुका, खेडी यांच्या विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असतो.नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या या संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी हा धोरण ठरविणारा, राबविणारा असतो, याकरिता लोकप्रतिनिधींची निवडही पारदर्शी पध्दतीने होणे आवश्यक वाटते. ही निवड मतपत्रिकेद्वारे केल्यास अधिक पारदर्शी आणि उचित ठरते, यासाठी राज्यातील नगरपालिका, महानगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका मतपत्रिकेद्वारा घेण्यात याव्यात असे बहुसंख्य नागरिकांचे, राजकीय नेत्यांचे मत आहे, या मताचा आदर करावा,असे वीरेंद्र किराड यांनी निवेदनात म्हटले आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशिनद्वारे घेण्यात आल्या. त्यातून यंत्रातील दोष, घोटाळे आढळून आले. खुद्द मतदारांच्या मनातही निवडणूक निकालाबाबत शंका निर्माण झाल्या. इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान पद्धतीवर विश्वास राहिलेला नाही, याचाही विचार करावा, असे किराड यांनी निवेदनात म्हटले आहे.