नगरमध्ये काँग्रेसचा महापौर पदावर दावा ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जातीयवादी पक्षाला बाजूला सारून धर्मनिरपेक्ष पक्षातील उमेदवाराला महापौरपद द्या अशी मागणी करत येथील महानगरपालिकेच्या महापौर पदावर काँग्रेसने दावा केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसनेते लवकरच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार असून महापौरपदासाठी आता महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून महापौरपदासाठी शीला चव्हाण यांचं नाव समोर आले आहे. त्यांच्या नावाचा ठराव सुद्धा मंजूर केला आहे.

महापालिका स्थापन झाल्यापासून आतापर्यंत केवळ एकदाच महापौर पदाची संधी मिळाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अनेक वेळा महापौरपद आपल्याकडे राखले आहे. महापालिकेत पक्षीय बलाबल पाहिले तर काँग्रेसचे एकूण पाच नगरसेवक असून सर्वाधिक नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे सेनेचा महापौर होणार हे स्पष्ट आहे दुसरीकडे महापालिकेच्या स्थापनेपासून फक्त एकदाच काँग्रेसला महापौरपदाची संधी मिळाली होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं प्रत्येकी तीनवेळा महापौरपद आपल्याकडे राखले होते. मात्र यावेळी राजय्त महाविकास आघाडी सरकार आहे. त्यातच महापौरपद हे अनुसूचित जाती (महिला) साठी राखीव आहे, त्यामुळे नगरसेविका शीला चव्हाण यांच्या उमेदवारीचा ठराव मांडण्यात आला आहे.असे काळे यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची लवकरच काँग्रेसचे नगरसेवक भेट घेणार आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे संख्याबळ असूनही महाविकास आघाडीचा धर्म पाळत शिवसेना महापौरपद काँग्रेसला देते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.