70 हजारांची लाच घेणार्‍या कनिष्ठ अभियंत्यासह दोघे जण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – विनापरवाना घराचे बांधकाम करणा-या कॉन्ट्रक्टरकडून 70 हजाराची लाच कर्मचा-यांच्या माध्यमातून घेणा-या महापालिकेच्या गोवंडी एम. पूर्व विभागातील कनिष्ठ अभियंत्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

कनिष्ठ अभियंता सुनील मासोदे, अमर तांबे असे अटक केलेल्या कर्मचा-यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मासोदे हा महापालिकेत कनिष्ठ अभियंता आहे. तर त्याच्याविरोधात तक्रार देणारे पत्रकार असून त्यांचे मित्र बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी एका घराचे बांधकामाचे काम घेतले होते. मात्र त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे त्या बांधकामावर कारवाई होऊ द्यायची नसेल तर 70 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी मासोदे यांनी केली होती. या प्रकरणी ठेकेदाराच्या मित्राने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करून कनिष्ठ अभियंता मासोदेसह कर्मचारी अमर तांबेला एसीबीने अटक केली आहे.