‘भाजपने मला निवडणूक न लढण्यास सांगितलं आहे’ : मुरली मनोहर जोशी

लखनौ : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या नावाला कात्री मारण्यात आली होती. मुरली मनोहर जोशी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जोशी यांनी आज कानपूरमधील मतदारांना पत्रातून सांगितले आहे की, पक्षानेच त्यांना निवडणूक लढवू नये असे सांगितले आहे. मुख्य म्हणजे या पत्रावर जोशी यांचे हस्ताक्षर नाही असे समजत आहे.

कानपूरमधील आपल्या मतदारांना लिहिलेल्या पत्रात मुरली मनोहर जोशी म्हणतात की, “कानपूरमधील माझ्या प्रिय मतदारांनो, भारतीय जनता पक्षाचे संघटन महामंत्री रामलाल यांनी मला कानपूरसह कोणत्याही मतदार संघातून निवडणूक न लढण्यास सांगितले आहे.”

२०१४ साली काँग्रेसच्या श्रीप्रकाश जयस्वाल यांना हरवत जोशी खासदार झाले होते. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवार यादीतून भाजपचे मार्गदर्शक मंडळाचे सदस्य लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची वगळण्यात आली आहेत. दरम्यान अडवाणींचा पत्ता कट झाल्यानंतर अडवाणी यांच्या गांधीनगर या मतदारसंघातून आता भाजपाध्यक्ष अमित शाहांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. मुरली मनोहर जोशी यांच्या कानपूर मतदार संघातून भाजपकडून सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नेत्यांचे नाव भाजपाच्या उमेदवार यादीतून वगळल्यानंतर मात्र विरोधकांनी भाजपवर या मुद्द्यावरून टीका केल्याचे दिसून आले. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना तिकीट नाकारून भाजपनं ज्येष्ठांचा अपमान केला आहे अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.