मशिदीत अथवा सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नमाज पठण करावी : मुरबाड पोलीस

मुरबाड पोलीसनामा ऑनलाइन – रिपोर्टर अरुण ठाकरे : मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना नुकताच सुरू झाला असून त्या अनुषंगाने वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावा बाबत दक्षता घेण्यासाठी मुरबाड पोलीस स्टेशनकडून शहरात काल जनजागृती करण्यात आली.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला असून यात महाराष्ट्रात कोरोना बधितांची आकडेवारी अव्वल क्रमांकावर असतांना कोरोना संसर्गाने चहू बाजूने वेढा घातलेला मुरबाड तालुका प्रशासनाच्या सतर्कतेने तथा मुरबाडकरांच्या संयमाने अद्याप सुरक्षित राहिला आहे. त्यामुळे यंदाचे विविध सणोत्सव घरातच कुटुंबा समवेत साजरे करण्याबाबत पोलिसांकडून जनजागृती सुरू आहे.

नुकताच मुस्लिम धर्माचा पवित्र मनाला जाणार रमजान महिना सुरू झाला असून मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करण्यासाठी मशीदमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच ती पठण करावी. तसेच शासनाने घालून दिलेल्या कायदेशीर व सामाजिक पथ्यांचे पालन करून घराबाहेर न पडता यंदाचा हा सण आपापल्या घरातच कुटुंबा सोबत साजरा करावा असे आवाहन मुरबाड पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे. यावेळी रिक्षावर भोंगा लावून तमाम मुस्लिम बांधवाना रमजान सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून प्रबोधनकरून जनजागृती करण्यात आली. तर शहरातील मुस्लिम मोहल्ल्याच्या नागरिकांनी आपल्या दारातून, गॅलरीतून टाळ्या वाजवून व फुलांचा वर्षाव करून पोलिसांच्या या संकल्पनेचे स्वागत केले.

सदर संकल्पनेचे आयोजन मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनायक खेडकर तसेच अमोल महाजन व त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत मुरबाड जामा मशिदीचे अध्यक्ष अजीम पठाण, मुस्तकीम सय्यद व अशपाक बेग आदी मुस्लिम बांधव होते.