खुनातील आरोपीची मेंटल हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात दाखल असणाऱ्या एका कैद्याने मेंटल हॉस्पिटलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज रात्री हा प्रकार घडला आहे.

सुनील प्रजापती (वय 25, धारवाड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील प्रजापती याला धारवाड रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात होता. दरम्यान अचानक त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे त्याला दहा ते पंधरा दिवसांपूर्वी येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला एका खोलीत ठेवले होते. झोपताना पांघरून घेण्यासाठी मोठी रझई दिली जाते. सुनील याने त्याच रझईची एक बाजू फाडून काढली. त्यातून एक दोरी तयार केली. तसेच त्या दोरीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान रात्री साडे 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याची माहिती कारागृह आणि येरवडा पोलिसांना दिली. त्यानंतर येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनील याचा मृतदेह खाली काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अद्याप शवविच्छेदन झालेले नाही. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान कारागृहातील कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like