‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला कट, सोनं लुटण्यासाठी वृद्ध महिलेचा घेतला जीव

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – कर्ज झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या खर्चाला कात्री लावतो. तर कधीकधी कर्ज आणि बँकेच्या तगाद्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, भिवंडीमध्ये कर्जबाजारी असलेल्या एका दाम्पत्याने आपल्याच शेजारी असलेल्य वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी महिलेनं सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोल पाहून वृद्ध महिल्याच्या खुनाचा कट रचला होता.

सोनूबाई कृष्णा चौधरी (वय-70 रा. चौधरपाडा) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर सोमनाथ वाकडे आणि त्याची पत्नी निलम वाकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके त्यांच्या मागावर होती. याप्रकरणी मयत सोनूबाई चौधरी यांचा मुलगा कृष्ण चौधरी याने पाडघा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

भिवंडी तालुक्यातील वडूनवघर या गावालगत असलेल्या छोट्या तलावामध्ये एका अज्ञात वृद्ध महिलेचा तोंड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करत असताना मृत महिलेचे नाव सोनूबाई चौधरी असल्याचे निष्पन्न झाले. सोनूबाई या 21 नोव्हेंबर दुपारी दोन पासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार कृष्ण चौधरी यांने पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली. या गुन्ह्याचा तपासामध्ये चौधरपाडा ते वडूनवघर या दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. मयत चौधरी यांच्या घराजवळ चौकशी करत असताना आरोपी सोमनाथ आणि त्याची पत्नी निलम यांच्यवर संशय बळावल्याने आणि त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

असा केला गुन्हा
सोमनाथ हा चालक म्हणून काम करत होता. त्याच्या डोक्यावर मोठे कर्ज होते. तर त्याची पत्नी निलम ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. दोघांच्या पगारातून घर खर्च भागत नव्हता. त्यातच सोमनाथने एक एसी, आयफोन, आणि होंडा शाईन दुचाकी हप्त्यावर घेतल्या होत्या. याचे हप्ते थकले होते. हप्ते कसे भरायचे याचा विचार करत असताना सोनूबाईला महिन्याला 18 हजार रुपये पेन्शन मिळत असल्याची माहिती सोमनाथला होती. सोनूबाईने पेन्शनमधून मिळणाऱ्या रकमेतून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले होते. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी जेवण झाल्यावर मयत सोनूबाई या गप्पा मारण्यासाठी आरोपीच्या घरी आल्या होत्या. त्यावेळी तिच्या अंगावर दागिने होते. हे दागिने विकून पैसे मिळवण्यासाठी निलमने कपडे धुण्याच्या धोपटण्याने सोनूबाईच्या डोक्यात मारून खून केला. नंतर सोमनाथने त्याच्या ताब्यातील होंडा सीटी कारमधून सोनूबाईचे प्रेत तलावात फेकून दिले.

आरोपीत महिला ही ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ हे कार्यक्रम बघून तीने सदरचा गुन्हा केला. आरोपी सोमनाथ वाकडे आणि नीलम वाकडे यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा सीटी कार तसंच मयत सोनूबाई हिचे अंगावर असणारे सोन्याचे गंठण, चेन, मण्यांची माळ आणि एक कर्णफूल असे एकूण 2 लाख 90 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. दोघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक भोई करीत आहे.

Visit : Policenama.com