भावजयीच्या प्रेमापोटी भावानेच केला भावाचा खून; बारामती तालुक्यातील कुतवळवाडीतील घटना

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दीर-भावजयी यांच्या प्रेम प्रकरणात अडथळा ठरणार्‍या भावाला जखमी करून आणि दगड बांधून विहिरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यामधील सुप्यानजीकच्या कुतवळवाडीत घडल्याचा समोर आला आहे.

रामदास विठ्ठल महानवर (वय 27) असे खून झालेल्याचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी त्याची पत्नी ताई आणि भाऊ गणेश या दोघांना अटक केलीय.

मयत रामदास हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याचा भाऊ गणेश महनवर याने 25 नोव्हेंबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यामध्ये दिली होती.

याचा तपास करताना रामदास याचा मृतदेह कुतवळवाडीतील सकटवस्ती इथल्या एका विहिरीतील पाण्यात तरंगताना (28 रोजी) आढळला. मृतदेह बाहेर काढला असता त्याच्या पोटाला 20 ते 25 किलो वजनाचा दगड निळ्या इलेक्ट्रीक वायरने बांधलेलाही आढळून आला.

तसेच डोक्यावर गंभीर वार केल्याचे दिसून आले. वडगावचे सहाय्क पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेत तात्काळ धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी रामदास याचा खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याची खात्री पोलिसांनी आल्याने अज्ञाताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता.

याचा तपास करत असताना मयत रामदास याचा भाऊ गणेश आणि मयताची पत्नी ही पोलिसांना विसंगत माहिती देत होती, हे पोलिसांच्या लक्षात आले. या दोघांना पोलिसी खाक्या दाखवत अधिक चौकशी केली असता मृताची पत्नी हिने दीर गणेश याच्यासह मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. या प्रेम प्रकरणात पती रामदास याचा अडथळा होत होता. त्यामुळे पूर्वनियोजित कट करून रामदास याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

त्यानंतर पोटाला दगड बांधत हा मृतदेह विहिरीत टाकून दिला, असे चौकशीत निष्पन्न झाले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यासह उपनिरीक्षक गणेश कवितके, साहय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदर मोहरकर, विशाल नगरे, किसन ताडगे, ज्ञानेश्वर सानप यांनी याचा छडा लावलाय.