अनैतिक संबंध उघड करण्याच्या धमकीतून खुन ; 14 महिन्यांनंतर झाला खुनाचा उलगडा

औरंगाबाद : अंमलनेर येथील २९ वर्षाचा तरुण गेले १४ महिने बेपत्ता होता़ त्याचा कोठेही शोध लागत नव्हता़ अशातच गंगापूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत बेपत्ता तरुणाचा खुन झाल्याचे उघड झाले. अनैतिक संबंधातून त्यांनी या तरुणाचा खुन करुन मृतदेह पूरुन टाकल्याचे सांगितले.

गणेश दामोदार मिसाळ असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंमळनेर शिवारातील पांडुरुग गाडे यांच्या शेतात पुरलेला मृतदेह पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने उकरुन बाहेर काढला. सचिन ज्ञानेश्वर पंडित आणि रवींद्र कारभारी बुट्टे (दोघेही रा. अंमळनेर, ता़ गंगापूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी, अंमळनेर येथील गणेश मिसाळ हा ५ ऑक्टोबर २०१९ पासून अचानक बेपत्ता झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला पण तो मिळून न आल्याने त्यांनी गणेश हरविला असल्याची तक्रार १० ऑक्टोबर रोजी गंगापूर पोलिसांना दिली. याप्रकरणाचा तपास तेव्हापासून सुरु होता. परंतु, काहीही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा नव्याने शोध घेणस सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांना सचिन पंडित आणि रवींद्र बुट्टे यांच्यावर संशय आला. दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी गुन्हा कबुल केला.

सचिन पंडित याचे गावातील एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. याची माहिती गणेश याला लागली होती. हे संबंध उघड करण्याची गणेश सचिन याला वारंवार धमकी देत होता. या कारणावरुन सचिन व रवींद्र यांनी गणेश याचे अपहरण करुन त्याचा दोरीने गळा आवळून खुन केला व त्याचे प्रेत गाडे यांच्या शेतात पुरुन टाकले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने शेतात खोदून मृतदेह बाहेर काढला. या तपासाबद्दल पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.