१२ तासाच्या आत मजुराच्या खूनाचा गुन्हा उघड

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – म्हाळुंगे, बालेवाडी येथे सुरु असलेल्या पुराणिक बिल्डरच्या बांधकाम साईटवर मजूर काम करणाऱ्या कामगाराचा खून करणाऱ्या त्याच्याच सहकाऱ्याला हिंजवडी पोलिसानी अटक केली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या भांडणातून गळा आवळून खून केल्याचे अवघ्या बारा तासाच्या आत पोलिसांनी उघडकीस आणले.

रवींद्र सोय (२१, रा. कामगार वसाहत, म्हाळुंगे, मूळ- झारखंड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर दिनेश महिमा प्रधान (२७, रा. कामगार वसाहत, म्हाळुंगे, मूळ- ओडीसा) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाळुंगे, बालेवाडी येथे पुराणिक बिल्डरची बांधकाम साईट आहे. या ठिकाणी झारखंड, ओडीसा येथील कामगार काम करतात. गेली दोन दिवस रवींद्र हा कामावर आला नव्हता. त्यामुळे आज सकाळी त्याचे इतर सहकारी त्याला पाहण्यासाठी तो राहत असलेल्या खोलीत गेले. त्यावेळी रवींद्र हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तसेच त्याच्या तोंडात आणि गळ्याला टॉवेल अडकवलेल्या आवस्थेत तो होता.

हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, जोगदंड, उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, गवारी व त्यांच्या पथकाने शोध सुरु केला. संशयावरुन दिनेश याला ताब्यात घेतले. पोलिसानी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. दिनेश आणि रवींद्र या दोघांचे किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याचा राग मनात धरून दिनेश याने टॉवेलने तोंड दाबून, गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.