चिंचवड येथील तरुणाच्या खून प्रकरणात सराईत गुन्हेगाराला अटक

चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

पूर्वीच्या भांडणातून एका तरुणाचा धारदार कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण करुन खून करण्यात आला होता. हा प्रकार बुधवारी (दि.२९) रात्री साडेअकराच्या सुमारास चिंचवड पोलीस ठाण्याच्या जवळ झाला होता. या प्रकणातील एका सराईत गुन्हेगाराला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

आकाश उर्फ रायबा तानाजी लांडगे (२४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रफुल्ल राजेंद्र ढोकणे (२०, रा. आनंदवन कॉलनी, थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे. तर रणजीत बापु चव्हाण (२७, रा. वेताळवाडी झोपडपट्टी, चिंचवड), स्वप्नील ऊर्फ बाबा मोरे (२३), सोन्या वराडे हे फरार असून चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. प्रशांत ज्ञानोबा वीर (४४, रा. लक्ष्मीगंध अपार्टमेंट, पागेची तलीमजवळ, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास आकाशच्या गाडीचे पेट्रोल संपले होते. तो पेट्रोल आणण्यास गेला त्यावेळी मामाच्या नोकराला सोबत घेऊन आला मात्र पेट्रोल टाकून सुद्धा गाडी सुरू होत नव्हती. त्यामुळे तेथे गाडी सोडून निघणार तेवढ्यात दुचाकीवर आलेल्या चौघांनी त्याच्यावर वार केले. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे पावणे तीनच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या आकाश लांडगे याच्यावर गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी रणजीत चव्हाण याच्यावर आठ गुन्हे दाखल असून त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील अटक करण्यात आलेला प्रफुल्ल ढोकणे आणि फरार सोन्या वराडे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

रणजीत चव्हाण हा तडीपार असताना देखील त्याने शहरात येऊन खून केल्यामुळे पोलिसांचा आरोपींवरचा वचक कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. तसेच तडीपार गुंडाचा वावर शहरात होत असताना देखील पोलिसांना याची माहिती मिळत नाही. त्यामुळे पोलिसांच्या खब-यांचे जाळे देखील कमकुवत झाल्याचे स्पष्ट होतेय.

संबंधित घडामोडी:

चिंचवड पोलीस ठाण्याच्या जवळच पूर्ववैमनस्यातून एकाचा खून