व्यापाऱ्याच्या हत्येची ‘सुपारी’ देणाऱ्या राजेश नहारचा गोळ्या घालून खून, परिसरात प्रचंड खळबळ

जालना : पोलीसनामा ऑलनाइन – दुसऱ्या व्यापाऱ्याची सुपारी दिल्याप्रकरणातील संशयित आरोपी असलेले परतुर येथील व्यापारी राजेश नहार यांच्यावर शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना जालना -मंठा महामार्गावरील वाटूर फाट्याजवळ घडली. नहार यांच्या डोक्यात आणि गालावर गोळ्या लागल्या होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

जालना येथील प्रसिद्ध व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर गोळीबार करणे तसेच बांधकाम व्यावसायिक गौतमसिंह मुनोत यांच्या घरी हल्ला करुन त्यांच्या खुनासाठी ५० लाख रुपयांची सुपारी देणे यासह काही गुन्हे राजेश नहार याच्याविरुद्ध होते. दुसऱ्या व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी देणाऱ्या राजेश नहार यांची हत्या सुपारी घेणाऱ्या गुंडांकडून केली गेली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश नहार हे शनिवारी रात्री स्वत: कार चालवत परतूरकडे जात होते. यावेळी वाटूरफाट्याजवळ कार आली असताना तिच्यावर काही जणांनी गोळीबार केला. त्यातील काही गोळ्या कारवर लागल्या. गाडी थांबल्यावर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या दोन गोळ्या त्यांच्या शरिरात शिरल्या. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांनी त्यांना मंठा चौफुलाजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/