मालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांवर FIR दाखल

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम साईटवर साहित्य नेऊन टाकल्यानंतर भाड्याच्या पैशावरून वाद घालत चौघांनी बेदम मारहाण करून मालवाहू ऑटोचालकाचा खून केला. वसंतनगरमध्ये सोमवारी (दि.10) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

सैयद अली सैयद लाल असे खून झालेल्या ऑटोचालकाचे नाव आहे. या प्रकरणी शाहिदाबी सैयद अली यांनी वसंतनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सैयद मोहसीन सैयद बाबू, सैयद बाबू सैयद रहीम, सैयद बाबू सैयद मोहीन, अजहर खान अफसर खान आदीवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वसंतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सैयद अली याने सैयद मोहसीन सैयद याचे बांधकाम साहित्य ऑटोतून नेऊन टाकले. त्याचे भाडे मागण्यासाठी सैयद अली हा सोमवारी सायंकाळी सैयद मोहसीन याच्या घरी गेला होता. त्यावेळी मोहसीनच्या वडिलांनी त्याला परत पाठविले. नंतर चारही आरोपी ऑटोचालक सैयद अली याच्या घरी आले. त्यांनी भाड्याच्या पैशावरून वाद घालत सैयद अली याच्यावर लोखंडी फावड्याने जीवघेणा हल्ला केला. यावेळी सैयद अलीचा मुलगा मोठमोठ्याने ओरडल्याने आरोपी पळून गेले. गंभीर सैयद अली याला तातडीने नांदेड येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वसंतनगर पोलीस तपास करत आहेत.