कौटुंबिक वादातून दारुड्या जावयाचा खून

पोलिसनामा ऑनलाईन – कौटुंबिक वादातून जावायचा खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या प्रकरणी सासरा आणि मेव्हण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उदय लोखंडे असे खून झालेल्याचे नाव आहे.

चर्‍होली गावा शेजारी असलेल्या मोकळ्या एका घराजवळील मोकळ्या जागेत काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. उदय हा दारूच्या आहारी गेला होता. शिवाय कौटुंबिक कारणावरून त्याचे सासरच्या मंडळीशी नेहमी वाद व्हायचे. उदयचा मृतदेह मिळून आल्यानंतर त्याच्या वडिलाने आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सासरा हनुमंत सोनवणे आणि मेव्हणा किरण सोनवणे यांनी खून केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ज्यावेळी उदयचा खून झाला तेव्हा दोघेही घटनास्थळी उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उदयचा खून नेमका कुणी केला याचा आम्ही शोध घेत असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, असा विश्वास आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी व्यक्त केला आहे.