कंपनीच्या ऑफिसमध्येच वृद्ध सफाई कर्मचाऱ्याची गळा चिरून हत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – एका कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करणा-या सफाई कर्मचा-याची गळा चिरून निर्घूण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. 9) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

लक्ष्मण मलिक (वय 65) असे खून झालेल्या वृध्द सफाई कर्मचा-याचे नाव आहे. गणेशपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोर रजत संकुल ही बहुमजली इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या माळ्यावर एका सदनिकेत हेल्थ केअर प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीचे ऑफिस आहे. येथे लक्ष्मण मलिक सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. तो मूळचा जरीपटका येथील रहिवासी असून ऑफिस बंद झाल्यानंतर तो तिथेच राहत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ऑफिसचे कर्मचारी निघून गेल्यानंतर मलिक तेथे थांबला. मंगळवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ऑफिस उघडायला कर्मचारी आले तेंव्हा मलिक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. तसेच त्याचे हात मागे बांधलेले , गळ्यावर कैची सारख्या हत्याराचे वार खुणा होत्या. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती गणेशपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी इमारतीतील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. ठसे तज्ञ अन् श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे.