नदीपात्रातील ‘त्या’ खुनाचा उलगडा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पूर्व वैमनस्यातून ‘तुझी विकेट काढतो’ अशी धमकी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराचीच विकेट काढल्याचा प्रकार समोर आला आहे. आठ दिवसांपूर्वी पवना नदी पात्रात आढलेल्या खुनाच्या प्रकारातील मृतदेहाचे गूढ उकलण्यात तळेगाव पोलिसांना यश आले आहे.

मंगेश उर्फ दाद्या अनंता भागवत (३८, रा.सोमाटणे, तळेगाव दाभाडे), असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर श्रीकांत मुऱ्हे, स्वप्नील हृदयनाथ काळे, प्रवीण ऊर्फ बारक्या रमेश शेडगे यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी सायंकाळी गहुंजे येथील पवना नदीपात्रामध्ये एक मृतदेह मिळाला होता मृतदेहाची ओळख पटली नव्हती, मात्र त्यावर जखमा असल्याने पोलिसांचा घातपाताचा संशय बळावला. दरम्यान मृतदेहावर ओम व आई या गोंदलेल्या शब्दांवरून ओळख पटली. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली. एक धागा सापडल्याने पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक बाजगिरे व यांच्या पथकाने माग काढून संशयीत ताब्यात घेतले.

कसून चौकशी केली असता भागवत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे मुऱ्हे याच्यासोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी दोघांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान भागवत याने तुझी विकेट काढणार अशी धमकी मुऱ्हे याला दिली होती. यामुळे मुऱ्हे याला स्वतःचे बरेवाईट होण्याची भीती होती. अखेर त्याने स्वतःच भागवतला संपविण्याची योजना आखली. दोन साथीदारांच्या मदतीने मुऱ्हे याच्या शेतात भागवतला मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह पवना नदीच्या पात्रात टाकुन पळ काढला होता. तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.