धक्कादायक ! हात-पाय बांधून विष पाजून पतीचा खून ; पत्नीसह ६ जणांवर गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगावला घरी चल म्हटल्याच्या रागातून पत्नीने इतरांच्या मदतीने विषारी औषध पाजून पतीचा खून केला. कर्जत तालुक्यातील थेरवाडी येथे शुक्रवारी (दि. 3)सायंकाळी विष पाजल्यानंतर पतीवर नगर येथील साई एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि. 7) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने पतीचा खून केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

लहू रामराव शेळके (रा. कोरेगाव, ता. कर्जत) हे मयत व्यक्तीचे नाव आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पत्नी वंदना लहू शेळके, कांतीलाल थोरात, बापू गोडसे, पद्ममिनी पवार व इतर दोन अनोळखी व्यक्ती (सर्व रा. थेरवाडी, ता. कर्जत) यांचा समावेश आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, वंदना ही लहू शेळके यांची दुसरी पत्नी आहे. काही दिवसांपासून दुसरी पत्नी माहेरात राहत होती. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लहू शेळके हे थेरवाडी येथे गेले. पत्नी वंदना हीस ‘तू माझ्यासोबत कोरेगावला चल’, असे म्हणू लागले. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने इतरांच्या मदतीने लहू शेळके यांना पकडले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना खाली पाडले. इतरांनी हात धरले व पत्नी वंदना हिने विषारी औषध तोंडात ओतले. तसेच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लहू शेळके यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा सागर शेळके हा वडिलांना सोडविण्यासाठी गेला असता इतर दोघांनी त्याला पकडून ठेवले. विष पाजल्यानंतर सर्वजण पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या लहू शेळके यांना उपचारासाठी कर्जत येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नगर येथील साई एशियन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शेळके यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा सागर लहू शेळके (वय 24) यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण हे करीत आहेत.