Akola News : अनैतिक संबंधातून अकोट तालुक्यात हत्याकांड, सर्वत्र खळबळ

अकोट : पोलीसनामा ऑनलाइन – अकोट तालुक्यात अनैतिक संबंधातून खूनाच्या दोन घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी मध्यरात्री अकोट तालुक्यातील सुकळी येथे चुलत भावाने भावाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केला. तर दुसरीकडे अकोली जहाँगीर येथे पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा आवळून खून केला. या दोन्ही घटना मंगळवारी (दि.2) उघडकीस आल्या.

सोमवारी (दि.1) मध्यरात्री सुकळी येथील दिपक शेषराव हरमकार याने त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन त्याचा चुलत भाऊ गोपाल धनराज हरमकार (वय-27) याचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दिपक हरमकार याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

दुसरी घटना अकोली जहाँगीर येथे घडली आहे. येथील निर्मला अशोक सोनवणे (वय-55) या महिलेचा चारित्र्याच्या संशयावरुन पती अशोक सनोवणे याने खून केला. अशोक सोनवणे याने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.2) पहाटे उघडकीस आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी आरोपी अशोक सोनवणे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.