कोथरुड कचरा डेपोतील मृतदेहाचे गूढ उकलले, तो खून अनैतिक संबंधांतून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोथरुडच्या कचरा डेपोमध्ये सापडलेल्या त्या मृतदेहाचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मयताची ओळख पटवून कोथरुड पोलिसांनी खून करणाऱ्याला अटक केली. प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने त्याचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून खून केल्याचे समोर आले आहे.

जयराम परमार असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने ९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड कचरा डेपोमध्ये एका खड्ड्यात पोत्यात हात पाय बांधलेल्या अवस्थेतील एक मृतदेह १५ फेब्रुवारी रोजी आढळला होता. त्यानंतर याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी याचा तपास सुरु केला तेव्हा मयत हा कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसींगमधील व्यक्ती असल्याचे समोर आले. त्यावरून त्याच्या नातेवाईकांना बोलवून पोलिसांनी ओळख पटविली. तेव्हा ती व्यक्ती सुभाष गोविंद जोरी (५०, कोथरुड) असल्याचे समोर आले. तसेच शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांचा कुणीतरी खून केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास करत असताना जोरी यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गाडीवर बसवून नेत खून केल्याचे समोर आले. तसेच यावेळी पोलिसांनी जोरी याच्या घराजवळ व कामाच्या ठिकाणाजवळ अधिक तपास केल्यावर पोलीस शिपाई राकेश टेकवडे यांना माहिती मिळाली की, सुभाष जोरी यांचा खून जयराम परमार याने केला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा परमार हा किश्किंदानगर परिसरातील डोंगर परिसरात मिळून आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे तपास केल्यावर त्याचे जोरी याच्या सुनेसोबत प्रेम संबंध असल्याने त्यास तो अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याला कामानिमित्त दुचाकीवर सोबत नेत त्याचा गळा दाबून खून केला. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हातपाय बांधून पोत्यात बांधले व ते कचरा ड़ेपो येथे नेऊन टाकला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप गायकवाड, पोलीस आदिनाथ खरात, सहायक पोलीस फौजदार दत्ता शिंदे, कर्मचारी विलास जोरी, राकेश टेकवडे, श्रावण शेवाळे, रानवडे, यांच्या पथकाने केली.