धक्कादायक ! वृद्ध इसमाच्या डोक्यात दगड घालून निर्घुनपणे खून

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन (हनुमंत चिकणे) – वृद्ध इसमाच्या डोक्यात दगड घालून निर्घुनपणे खून केल्याची घटना वडकी (ता. हवेली ) हद्दीतील पवार मळा रस्त्यावर बुधवारी (ता. १७ ) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

चंद्रकांत शंकर चव्हाण ( वय ६८, रा. पांडवनगर, वडकी, ता. हवेली ) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा रमेश चंद्रकांत चव्हाण ( वय ४०, रा. पांडवनगर, वडकी, ता. हवेली ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, रमेश चव्हाण हे पुणे येथील एका खाजगी दवाखान्यात काम करतात. बुधवारी सकाळी वडील सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर वडकी येथील लग्नाला जातो असे सांगून घरमधील दुचाकी गाडी घेऊन निघून गेले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणार्‍या शिवाजी शेवाळे यांनी घरी येऊन संगितले की, तुमचे वडील नाना शेवाळे यांचे गोडावून समोरील रस्त्यावर पडले आहेत. त्यांच्या डोक्यास मार लागला असून डोक्यातून रक्तस्राव होत असल्याची माहिती दिली.

हे समजताच तात्काळ जाऊन पाहणी केली असता कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वडील मयत झाल्याचे लक्षात आले.

गोडावून समोर असणार्‍या विजय खरात या टेम्पो चालकास विचारणा केली असता, त्यांनी संगितले की चंद्रकांत चव्हाण व अज्ञात इसम यांच्यात खूप वेळ बाचाबाची चालु होती. त्यांनातर अनोळखी इसमाने खाली पडलेला दगड उचलला व तुमच्या वडीलांच्या डोक्यात मारला. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले. हे पाहून तो इसम पटकन निघून गेला असे सांगितले. सदर माहिती मिळालेनंतर रमेश चव्हाण यांनी ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात जावून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणांवरून भांडण करून आपले वडील चंद्रकांत चव्हाण यांचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याची तक्रार दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नणवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस हवालदार नीलेश राणे, आदि घटना स्थळी पोहचले व मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.