उस्मानाबाद : अशोक झोरी यांच्या नातेवाइकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मोहा (ता.कळंब) येथील अशोक झोरी (वय ६५) यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट दिसत असतानाही, कळंब पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करत नसल्याने मृताच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली आहे. कळंब पोलिसांनी मात्र न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल सांगितले.

मृतांच्या नातेवाइकांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहा शिवारात अशोक झोरी यांची शेती आहे. त्यांच्या शेजारच्या व्यक्ती बरोबर झोरी यांचा शेतीबाबत वाद होता. यावरून दोन्ही कुटुंबात गेल्या महिनाभरापासून कुरबुरी सुरू होत्या. त्यातूनच शिविगाळ व मारहाणीचे प्रकारही घडले आहेत. यावर कळंब पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई न करता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून बोळवन केली.

ही मारहाण कोणी केली कोणावर संशय आहे याची माहिती पोलीसांना मृताचा मुलगा सुदर्शन झोरी यांनी जबाबात दिली आहे. तरीही पोलिसांनी संबंधित संशयितावर अजूनही कारवाई केलेली नाही. अथवा खुनाचा गुन्हे दाखल केलेला नाही. यामुळे जिल्हाभरात पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त