पूर्ववैमनस्यातून तरुणाचा सपासप वार करून खून, पुणे जिल्ह्यात खळबळ

पुणे/मुळशी : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी तालुक्यातील लवळे येथे पूर्ववैमनस्यातून प्रतिक प्रकाश सातव (वय -28) या तरुणाचा पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना आज लवळे ते भरे रस्त्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे मुळशी तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

रस्त्यात ट्रॅक्टर आडवा लावून एकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. मुळशी तालुक्यातील लवळे ते भरे रस्त्याच्या दरम्यान ही घटना घडली असून मुळशी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पौंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनसुर, प्रतिक सातव आणि त्याचे दोन मित्र नवीन चारचाकी गाडी घेऊन चालले होते. मारेकऱ्यांनी त्यांच्या नवीन गाडीला ट्रॅक्टर आडवा लावून प्रतिकला बाहेर काढून त्याच्यावर कोयता आणि तलवारीने सपासप वार केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने प्रतिकचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरक्षक अशोक धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पौड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदनासाठी पाठवून दिला. प्रतिक सातव याच्यावर पौड पोलीस ठाण्यात मारामारीचे 324 आणि 325 कलमान्वये दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना आरोपींची नावे निष्पन्न झालेली असून आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके पाठवण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे. घटनास्थळी हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

Visit : Policenama.com