पत्नीशी अश्लील बोलला अन् मग मित्रानं मित्राचाच काटा काढला, मृतदेह नदीत फेकला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सोबत रिक्षा चालवत असताना ओळख झालेल्या मित्राने पत्नीशी अश्लील भाषेत बोलल्याच्या कारणावरून मित्राने अपहरण करून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुण्यातील संगमवाडी येथील नदीत फेकून दिला. अपहरण वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. खून देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत केला तर मृतदेह शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेकला.

रोहित किसन कांबळे (१९) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आकाश साळवे (२५) आणि इलियाज शेख (२१) यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित किसन कांबळे याचे गुरुवारी अपहरण झाले होते. या प्रकरणी मयत रोहितच्या आईने वाकड पोलिसांत फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार वाकड पोलीस रोहितचा शोध घेत होते. दरम्यान, आज पुण्यातील संगमवाडी येथे रोहितचा मृतदेह मिळाला. या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर मित्रानेच खून केल्याचं उघड झाले आहे. रोहित हा आकाश आणि इलियाज यांचा मित्र होता. हे तिघे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत. मयत रोहित हा आकाशच्या पत्नीला अश्लील बोलला होता. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाला होता. यामुळे त्याने मित्र इलियाजच्या साथीने रोहितचे अपहरण करून खूनाचा कट रचला.

कटाप्रमाणे गुरुवारी त्याच्याच रिक्षातून रोहितला लोणावळा येथे फिरण्यासाठी जाऊ असे म्हणून दोघांनी तळेगाव परिसरातील भेगडेवाडी येथे नेले. तिथे दोघांमध्ये भांडण झाले, यातून आकाशने साथीदार इलियाजच्या मदतीने रोहितचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी रिक्षातून रोहितचा मृतदेह पुण्यातील संगमवाडी परिसरात नेवून फेकून दिला होता.

Visit : Policenama.com