‘भिशी’च्या पार्टीत झालेल्या वादातून पुण्यात एकाचा खून, आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भिशीच्या पार्टीत झालेल्या वादातून एकाला चाकूने भोकसून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.16) वारजे माळवाडी येथे घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा रविवारी (दि.17) उपचारादरम्यान मृत्यू झाला. यल्लप्पा बसप्पा तळकेरे (वय-45 रा. वारजे माळवाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी मोहम्मद रफिक नबीसाब शेख (वय-38 रा. पी.एम.सी. कॉलनी, शिवाजीनगर) याला वारजे पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार वारजे माळवाडी येथील आदित्या फ्लोरा हाईट्सच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत घडला होता. शिवबाई तळकेरे (वय-40 रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मोहम्मद शेख याच्यासह एकावर गुन्हा दाखल केला असून शेख याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत यलप्पा तळकेरे याच्या ओळखीचे भिमराव बडगीर हे भिशी चालवत होते. चालु महिन्याची भिशी बडगीर यांना लागल्याने त्यांनी तळकेरे यांच्या घराजवळील एका मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये दारुच्या नशेत आरोपी शेख आणि फिर्यादी यांच्यात वाद झाले. याच वादातून आरोपीने फिर्यादी यांचे पती यल्लपा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच त्यांच्या पोटामध्ये चाकू भोकसला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने येलप्पा यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. व्ही. शेवते करीत आहेत.

Visit : Policenama.com