धारदार शस्त्राने सपासप वार करुन संगणक अभियंत्याचा खून 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – किरकोळ कारणावरून टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून गंभीर जखमी केलेल्या संगणक अभियंता तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डिलक्स चौक, पिंपरी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली होती. मंजीत प्रसाद (रा. काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी धरम्या, स्वप्नय, अमर याच्यासह पाच अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मोहन संभाजी देवकते (२५, रा. चंदननगर, पुणे) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजीत हा विमाननगर येथील डब्ल्यू.एन.एस. या कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता. तर देवकाते हे आपल्या टेम्पो ट्रॅव्हलर मधून आयटीतील अधिकाऱ्यांना सोडविण्यासाठी चालले होते. गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ते पिंपरीतील डिलक्स चौक परिसरात आले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी टेम्पो ट्रॅव्हलरच्या पुढे आडवी दुचाकी घालत टेम्पो चालकाला गाडी उभी करण्यास भाग पाडले. त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. टेम्पोत बसलेल्या मंजीतने ‘क्यों क्या हुआ’ अशी विचारणा केली. त्यावेळी एकजणाने खिडकीतून हात घालत मंजितच्या थोबाडीत मारली. थोबाडीत का मारली?. यावरून मंजित बसमधून खाली उतरला. थोबाडीत का मारली असा विचारण्यासाठी गेला असता त्याला पाच जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. मंजित याच्यावर धारदार शस्राने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी झालेल्या मंजित याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात खुनी ह्ल्याचा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

You might also like