‘तो’ खून अनैतिक संबंधातूनच ; २४ तासात गुन्हा उघड

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – विहिरीमध्ये पोत्यात बांधून टाकण्यात आलेल्या व मृतदेहाची ओळख पटविणे अवघड असताना या गुन्ह्याचा छडा लावण्यात रांजणगाव पोलिसांना २४ तासात यश आले. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

शनिवारी ११ मे रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिरुर तालुक्यातील खंडाळी गावातील अमृत दरवडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये पोत्यात बांधून टाकलेला एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्याचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे होते.
या मृतदेहाच्या डोक्यामध्ये, तोंडावर कसल्या तरी हत्याराने जबर मारहाण केल्याच्या जखमा होत्या. याबाबत रांजणगाव पोलीस ठाण्याला आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अनोळखी मृताची ओळख पटविणे अवघड झाले होते.

या मृतदेहाच्या वर्णनावरून रांजणगाव पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीमध्ये स्थानिक लोकांकडून माहिती घेतली असता तो शेतमजूर असून लागेल तिथे काम करीत होता. त्याचे नाव व पत्त्याबाबत काहीही माहिती मिळत नसल्याने पोलिसांना तपासामध्ये अडचणी येत होत्या.

त्यानंतर रांजणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी गुप्त बातमीदार यांच्यामार्फत व तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्याचा तपास करून संशयित गोरख भीमाजी थोरात (रा. वाघाळे, ता. शिरूर, जि. पुणे), विजय अरुण नारखेडे (सध्या रा. खंडाळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्या दोघांनी गणेश पाडेकर याची पत्नी रेश्मा गणेश पाडेकर हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. रेश्मा सुमारे सहा महिन्यांपासून विजय नारखेडे याच्यासोबत राहत होती. गणेश तिला गुरुवारी ९ मे रोजी दुपारी १ वाजता खंडाळे येथे विजय नारखेडे याच्या घरी आणण्याकरिता गेला होता. त्यावेळी रागातून गोरख थोरात व विजय नारखेडे या दोघांनी मिळून गणेश पाडेकर याच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारहाण करून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अमृत दरवडे यांच्या विहिरीत टाकून दिला, अशी कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक जयवंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस हवालदार तुषार पंधारे, अनिल चव्हाण, सुधाकर कोळेकर, संतोष घावटे, पोलीस नाईक अजय भुजबळ, प्रफुल्ल भगत, चंद्रकांत काळे, मिलिंद देवरे, मंगेश गवळी, अमोल नलगे, उमेश कुतवळ, गणेश सुतार, रांजणगाव पोलीस ठाणे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक फौजदार दत्तात्रेय गिरमकर, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, निमण, नीलेश कदम, राजू मोमीन यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like