Sangli News : अंगावर टेम्पो घालून पुतण्यानेच केला चुलत्याचा खून

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शेत जमिनीच्या वादातून अंगावर टेम्पो घालून पुतण्यानेच काकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उटगी (ता. जत) येथे उघडकीस आली आहे. उटगी ते चनगोंडवस्ती दरम्यानच्या रस्त्यावर बुधवारी (दि. 3) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर आरोपी हा फरार झाला आहे.

मल्लाप्पा धुंडाप्पा केसगोंड (वय 52) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी भालचंद्र उर्फ भाल्या सिद्धाप्पा केसगोंड (वय 40) याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी कर्नाटक व महाराष्ट्रात पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना झाली आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी दुचाकी जप्त केली आहे.

उमदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मल्लाप्पा केसगोंड यांची उटगीतील चनगोंड वस्ती येथे शेती आहे. आपल्या कुटुंबासह ते शेतात वास्तव्यास होते. केसगोंड व सशंयित आरोपी भालचंद्र यांच्यात गेल्या 20 वर्षापासून जमिनीचा वाद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी उच्च न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. आरोपीला ती जमीन हवी होती. मात्र हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने दोघेही न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान बुधवारी रात्री केसगोंड दुचाकीवरून शेताकडे जाताना आरोपीने मागून टेम्पोने धडक दिली. यात केसगोंड हे खाली पडले असता आरोपीने टेम्पोने त्यांना फरफटत नेल्याने ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविले. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करत आहेत.